0%

सप्तपदी

saptpadi

लाजाहोमानंतरचा विधी म्हणजे सप्तपदी. होमाच्या उत्तरेकडे मांडलेल्या तांदुळाच्या सात राशींवरून वराने वधूला चालवायचे असते. एकेका राशीवर एकेक पाऊल – व तेही उजवे पाऊल – ठेवायचे. ही सात पावले म्हणजेच सप्तपदी. प्रत्येक पाऊल ठेवल्यावर वर पुढील मंत्र किंवा त्या अर्थाचे वाक्य म्हणतो.

पहिले पाऊल – हे वधू, तुझे-माझे सख्य झाले आहे. तू अन्नदात्री व दीर्घायू संततीची माता हो.
दुसरे पाऊल – हे वधू, तू दोन पावले चालली आहेस म्हणून मला बलवर्धक हो.
तिसरे पाऊल – हे वधू, तू तीन पावले चाललीस, आता मला धन देणारी हो.
चवथे पाऊल – हे वधू, चार पावले चाललीस, आता माझी सुखवर्धिनी हो.
पाचवे पाऊल – हे वधू, तू पाच पावले चाललीस, आता संततिवर्धक हो.
सहावे पाऊल – हे वधू, तू सहा पावले चाललीस म्हणून सहाही ऋतूंत प्राप्त होणारे भोग देणारी हो.
सातवे पाऊल – हे वधू, तू सात पावले (माझ्याबरोबर) चालली आहेस. यास्तव माझी दृढ सखी हो.

सप्तपदी झाल्यानंतर वर वधूच्या मस्तकाचा आपल्या मस्तकाला स्पर्श करतो आणि मंगल कलशातील उदक आपल्या व वधूच्या मस्तकी लावतो. शांती असो, तुष्टी असो, पुष्टी असो असे म्हणतो. यानंतर वधूच्या पायात चांदीची जोडवी घातली जातात. त्यावेळी करवलीने वधूच्या पायाचा अंगठा हाताने दाबायचा असतो. सप्तपदी झाली की शास्त्रोक्त विवाहविधी पूर्ण झाला.

यानंतर विवाहानिमित्त जमलेल्या सर्व पाहुण्यांना मिष्टान्न भोजन व त्यानंतर विडे दिले जातात. वधू-वर आणि वरमाई आणि वराचे वडील, बहीण, भाऊ इत्यादींची खाशी पंगत बसते. त्यावेळी वधूने वराला व वराने वधूला घास देण्याची पध्दत आहे. पूर्वीच्याकाळी स्त्रियांनी आपल्या पतीचे नाव उच्चारण्याची पध्दत नव्हती. परंतु लग्नामध्ये मात्र विविधप्रसंगी पतीचे नाव अर्थपूर्ण अशा दोन किंवा चार ओळींच्या उखाण्यात गुंफून घेण्याची प्रथा होती. आजही ही प्रथा पाळली जाते. घास देताना वधू – वर असे उखाणे रचून वधू वराचे व वर वधूचे नाव त्यात गुंफतो. यावेळी आसपासची तरूणमंडळी वधूवरांची चेष्टा-मस्करीही करतात.

वरमाई जेवायला बसलेल्या पंगतीला ‘विहिणींची’ पंगत म्हणतात. विहिणीच्या पंगतीच्यावेळी वधूची आई अथवा वधूची आत्या किंवा काकू किंवा मावशी एक गाणे म्हणते. त्याला ‘विहीण’ असे म्हणतात. या विहिणीमध्ये विहीण म्हणणारी स्त्री वरमाईला अशी विनंती करीत असते की ‘आम्ही आमची मुलगी तुमच्या मुलाला दिलेली आहे. तिचा नीट सांभाळ करावा.’ ही विहीण म्हणतानाच लग्नाचा आतापर्यंत चाललेला आनंद व उत्साहाचा भाग थोडा थोडा भावनाप्रधान होऊ लागतो. विहिणीचे जेवण संपल्यावर वरमाईला वधूच्या आईकडून चांदीच्या लवंगा व चांदीचा कार्ल्याचा वेल दिला जातो.