0%

लग्न

प्रत्यक्ष लग्न जिथे लागणार त्या जागी दोन लाकडी पाट समोरासमोर (पूर्व व पश्चिम दिशेस) मांडून त्यावर तांदुळाच्या राशी घालतात. त्यावर कुंकवाने स्वस्तिके काढतात. या जागेला लग्नवेदी म्हणतात. एका पाटावर वरास पुष्पहार देऊन उभे करतात. वधूचा मामा वधूस हाताला धरून घेऊन येतो व दुस-या पाटावर उभे करतो. लग्नाचे वेळी मुलीला मामाने आणण्याचे कारण असे सांगतात, मामा हा मायेचा असतो. लग्नकार्याच्या दिवशी मुलीचे आई-वडील, काका हे आल्या-गेल्याचे स्वागत करण्यात व्यग्र असतात. त्यामानाने मामा मोकळा असतो. शिवाय मुलीला आजोळची ओढ ही जास्त असते. आणि सर्वसाधारणपणे काकापेक्षा मामाच अधिक माया करतो.

वधू-वरांच्यामध्ये एक वस्त्र आडवे धरून दोन्हीबाजूला भटजी उभे रहातात. या वस्त्राला अंतरपाट म्हणतात. अंतरपाटाच्या दोन्हीबाजूलाही कुंकवाची स्वस्तिके काढलेली असतात. गुरुजी मंगलाष्टके म्हणावयास सुरूवात करतात. लग्नासाठी जमलेल्यांना रंगीबेरंगी तांदुळाच्या अक्षता वाटतात. मधून मधून, एक मंगलाष्टक संपले की जमलेले सर्व लोक वधू-वरांवर अक्षतांचा वर्षाव करतात. वधू-वराच्यामागे त्यांच्या त्यांच्या करवल्या हातात करा (पाण्याने भरलेला कलश त्यामध्ये आंब्याची पाने व कुंकू लावलेला नारळ) व प्रज्वलित दीप घेऊन उभ्या राहतात. लग्नघटिकेच्यावेळी गुरुजी मंगलाष्टके संपवतात. मंगलाष्टकांची सांगता नेहमी खालील श्लोकाने होते.

तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव
विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तें घ्रीयुगं स्मरामी ||

याचा अर्थ असा की ‘आजच्या दिवशीचे हे लग्न, हा दिवस चांगला आहे, चंद्र व तारांचे बलही चांगले आहे, विद्या व दैव यांचेही चांगले बल पाठीशी आहे. परंतु यातील काही जर चांगले नसेल तर, हे महाविष्णू (लक्ष्मीपती) तुमच्या स्मरणाने हे सगळे चांगले होवो (जी काही उणीव आहे ती तुमच्या नामस्मरणाने भरून काढली जावो.)’

‘शुभमंगल सावधान’ चा दणदणीत गजर होतो. वराचा मामा अंतरपाट दूर करतो. वधू वराला पुष्पमाला घालते आणि वर वधूला पुष्पमाला घालते. वधूवरांनी एकमेकांना हार घातल्यानंतर अक्षतारोपण होते. अक्षतारोपण म्हणजे वधू-वरांनी दूध व तुपात भिजवलेली अक्षत परस्परांच्या मस्तकावर टाकणे. त्यावेळी खालील श्लोक म्हंटला जातो.

यज्ञोमे काम: भगोमे काम:|
श्रीयोमे काम: समृध्यताम् ||

याचा अर्थ असा की ‘चतुर्विध पुरुषार्थ सिध्द करताना, यज्ञयागादी कार्य करताना, द्रव्यार्जन करीत असताना, कल्याणकारी कार्यक्रम करीत असताना मला तुझ्या सहाय्याची आवश्यकता आहे’. हे विधान वधू व वर या दोघांनीही एकमेकांना उद्देशून म्हणायचे असते.

आता लग्न लागले. मंगल वाद्ये वाजू लागतात. हल्ली बहुदा बॅंड आणविला जातो व बॅंडवर गाणी वाजविली जातात. आता करवल्या आपापल्या हातातील मंगल कलशाचे पाणी वधू-वरांच्या डोळयांस लावतात. वधूची आई व वराची आई वधू-वरांना प्रेमाने ओवाळतात. वधू-वरांना आपापल्या जागा बदलून उभे करतात. वधूवरांना शुभेच्छा व भेट देण्यासाठी जमलेल्या लोकांची झुंबड उडते.  जमलेल्या पाहुण्यांचे पेढा व गोटा (फुलांचा छोटासा गुच्छ) देऊन स्वागत केले जाते.