0%

घाणा भरणे

ghana_bharane

लग्नाच्या सुरुवातीला विधीपूर्वक धान्य कांडणे या विधीला ‘घाणा भरणे’ असे म्हंटले जाते. हा समारंभ वधूच्या घरी तसेच वराच्या घरीही लग्नाच्या दिवशी साजरा केला जातो.हल्ली हा समारंभ कार्यालयातच होतो. आंब्याच्या पानांनी तसेच हळदीत बुडविलेल्या स्वच्छ चिंधीने किंवा जाड धाग्याने मुसळ सुशोभित केले जाते. पाच सुवासिनी व वधू/वर यांचे मातापिता मिळून उखळात तांदूळ, गहू , तीळ अशाप्रकारचे धान्य घालून कांडतात व कांडताना वधू व वर यांच्या मातापित्यांना उद्देशून मंगल ओव्या म्हणतात. खेडेगावातून, हे कांडलेले धान्य पुन्हा सुशोभित जात्यावर दळून वडयांच्या पिठात घालण्याची पध्दत आहे. यानंतर घाणा भरणा-या सुवासिनींना हळदी-कुंकू लावून त्यांची खणानारळाने ओटी भरण्याची पध्दत आहे. घाणा भरून झाल्यावर वधू-वर व तिचे-त्याचे आई-वडील यांना पाटावर बसवून सुवासिक तेल-उटणे लावतात. हा विधी लग्नाच्या दिवशीच सकाळी सुरुवातीला होतो. या कार्यक्रमापासून सनई, चौघडा अशी मंगल वाद्ये वाजविण्याची पध्दत आहे.