0%

गौरीहर पूजा

gaurihar
लग्नघटिका जवळ आलेली असताना वधू गौरी-हराची म्हणजे शंकर-पार्वतीची पूजा करते. यासाठी बाळकृष्ण व अन्नपूर्णा यांच्या छोटयाशा  मूर्तींची पूजा केली जाते. बाळकृष्ण हे शंकराचे व अन्नपूर्णा हे पार्वतीचे प्रतिक आहे. पूर्वी वधूच्या राहत्या घरातील देवधरात ही पूजा होत असे. हल्ली ती कार्यालयातील एका खोलीत करतात. पूर्वी पूजा मांडण्यासाठी दगडी पाटयाचा वापर होई. पाटयावर हळदीने गौरीहराची प्रतिमा काढून तांदुळाच्या राशींवर शंकर पार्वतीच्या(म्हणजेच बाळकृष्ण व अन्नपूर्णेच्या) छोटया मूर्ती ठेवतात. काहींकडे फक्त अन्नपूर्णेचीच चांदीची मूर्ती ठेवतात. एक छोटी तांदुळाची रास, इंद्रपत्नी ‘शची’ हिचे प्रतीक म्हणून मांडतात. ‘इंद्राच्या पत्नीला जसे विवाह भाग्य मिळाले, आरोग्य लाभले व पुत्रप्राप्ती झाली, तसेच मलाही मिळो’ अशी प्रार्थना वधू ‘शची’ला करते. तो श्लोक असा आहे –
‘देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्र प्रियभामिनी
विवाहं भाग्यम् आरोग्यम् पुत्रलभंच देही मे’
नंतर स्नान करून, मामाने लग्नाच्यावेळी नेसण्यासाठी दिलेली ‘अष्टपुत्री’ नावाची पिवळी साडी नेसून वधू गौरीहरापुढे, पूर्वदिशेला तोंड करून बसते व त्यांची मनोमन पूजा करते. संसार सुखाचा व्हावा, पतीबरोबर उत्तम मनोमिलन व्हावे म्हणून ती प्रार्थना करते. एक एक तांदूळ गौरीहराला अगदी सावकाश वाहत ‘गौरी गौरी सौभाग्य दे, दारी अतिथी (वर) येईल त्याला आयुष्य दे ‘ असे हळूहळू म्हणत राहते. वर लग्नासाठी बोहल्यावर उभा राहिला की वधूचा मामा गौरीहरापाशी येऊन मोठया मायेने व गंभीरपणे वधूचा हात धरून तिला विवाहासाठी बोहल्याकडे घेऊन जातो. वधू लग्न झाल्यावर सासरी जाताना माहेरकडून मिळालेली बाळकृष्ण व अन्नपूर्णेची मूर्ती बरोबर घेऊन जाते. या मूर्तीची स्थापना सासरच्या देवघरात केली जाते व सासरच्या घरातील इतर देवांबरोबर त्यांचीही नेहमी पूजा केली जाते.
वधू ज्यावेळी गौरीहरपूजा करीत असते त्यावेळी वराला व त्याच्या कुटंबियांना रुखवताचे जेवण दिले जाते. नंतर त्याला दूध व केळेही दिले जाते. त्यातील निम्मे दूध व केळे वधूला देण्यात येते.