0%

साखरपुडा

sakharpuda

पत्रिका जुळल्या आणि नवरा-नवरींची एकमेकांची पसंती झाली की वधू-वरांच्या कुटुंबीयाकडील लोक लग्न ‘पक्के’ करण्यासाठी हा विधी करतात. पूर्वी या विधीला ‘कुंकू लावणे’ म्हणत. अगदी पूर्वी ह्या विधीला अजिबात महत्त्व नव्हते. परंतु त्याविषयी धार्मिक विधी व मंत्र मात्र अस्तित्वात आहेत. प्रथम वराचा पिता चार नातेवाईक व प्रतिष्ठित लोकांना घेऊन कन्येच्या पित्याकडे जातो व आपल्या मुलासाठी त्यांच्या कन्येला विवाहाची मागणी घालतो. कन्येचा पिता घरच्यांची व मुलीची संमती घेऊन होकार कळवितो. सर्वांच्यादेखत वरपिता व वधूपिता हा विवाह निश्चित झाल्याचे जाहीर करतात. ह्याला वाङनिश्चय म्हणतात. म्हणजेच या विवाहाचा तोंडी व्यवहार पक्का झाला. हा विधी काही ठिकाणी गुरुजींमार्फत संस्कृतमधून होतो.

त्यानंतर लगेच साखरपुडा हा विधी केला जातो. वरपिता मुलीला कुंकू लावून साडी-चोळी व नारळ देतो आणि या शुभप्रसंगी तोंड गोड करण्यासाठी साखर देतो. म्हणून या विधीला ‘साखरपुडा’ असे नाव प्राप्त झाले आहे. हल्ली साखरेऐवजी पेढयाचा पुडा मुलीला देण्याची पध्दत आहे. तसेच ऐपतीनुसार मुलीला सोन्या-हि-याचा दागिनाही देतात. बहुधा हा दागिना म्हणजे अंगठीच असते. मुलीचा पिताही भावी जावयाची पूजा करून त्याला पोषाख देतो व सोन्याची किंवा खडयाची अंगठी देतो. हल्ली मुलगा-मुलगी यांनीच एकमेकांना अंगठी घालण्याची पध्दत प्रचलीत आहे. या समारंभानंतर चहा-फराळाचे आदरातिथ्य मुलीच्या वडिलांकडून केले जाते.

प्रत्येकाच्या हौशीनुसार व ऐपतीनुसार हा विधी हल्ली खूप मोठया प्रमाणावरही साजरा केला जातो. कित्येकदा हा ‘लघु-विवाहसोहळा’च असतो. कार्यालय घेऊन, जेवणावळ घालून वाजतगाजत हा विधी केला जातो. यानंतर प्रत्यक्ष विवाह होईपर्यंत मुलगा-मुलगी यांना एकमेकांचा अधिक सहवास घडावा, नीट परिचय व्हावा या उद्देशाने एकमेकांना वारंवार भेटणे थोडया प्रगतशील पालकवर्गाने मान्य केलेले आहे. प्रत्यक्ष विवाहबध्द होण्यापूर्वीचा हा ‘फुलपाखरी’ आनंदाचा काळ माणसांच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा काळ म्हणून गणला जातो.

यानंतर वधू-वर व त्यांचे कुटुंबीय यांच्या सोयीनुसार लग्नाचा मुहूर्त शोधला जातो. पूर्वी अशी पध्दत होती की दिवाळी नंतर तुळशीचे लग्न झाल्याशिवाय कोणताच लग्नमुहूर्त काढला जात नसे. हल्ली मात्र ही प्रथा पूर्णपणे पाळली जात नाही. हल्ली कार्यालयाच्या उपलब्धतेनुसार लग्नाची तिथी निश्चित होते. निमंत्रण पत्रिका छापल्या जातात. चांगला मुहूर्तपाहून प्रथम आपल्या कुलदैवताला मंगलकार्याला येण्याचे निमंत्रण केले जाते. निमंत्रणपत्रिका देताना तांदूळ व कुंकू एकत्र करून अक्षता तयार करतात व अक्षता आणि सुपारी घेऊन निमंत्रणासाठी वधू – वराचे आईवडील देवाला जातात. त्यानंतर मित्रमंडळी व नातेवाईक यांना निमंत्रणपत्रिका वाटल्या जातात व विवाहासाठी निमंत्रित केले जाते.

साखरपुडयापासून ते विवाहाच्या मधील काळात वधूचा पोशाख व दागदागिने यांची तसेच वराचा पोशाख यांची खरेदी केली जाते. ऐपतीनुसार वरपक्षाकडून वधूला वस्त्रे व दागिने खरेदी केले जातात. त्याचप्रमाणे वधूपक्षाकडूनही वरासाठी एखादा दागिना व वरमाई आणि इतर मानापानाच्या साडया, कापडे इत्यादींची खरेदी केली जाते. या कापडखरेदीला ‘बस्ता बांधणे’ असे नाव आहे.